मुंबई : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्री. संजय धोत्रे यांनी आज सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बंधू- स्वमदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत केले.
आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करताना मंत्री महोदय म्हणाले,”चांगली शैक्षणिक संस्था म्हणजे जेथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले स्वागत होत आहे आणि काळजी घेतली जाते,असे वाटते, जेथे सुरक्षित आणि उत्साही शैक्षणिक वातावरण असते, विस्तृत शैक्षणिक पध्दतीचा अनुभव मिळतो,जेथे उत्तम भौतिक पायाभूत सुविधा उपलब्ध असतात, उचित संसाधनांचा वापर शैक्षणिक अनुकूलतेसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी केला जातो. विद्यार्थी हे शैक्षणिक व्यवस्थेचे प्रमुख भागीदार आहेत. उत्साही महाविद्यालयीन जीवन उच्च दर्जाच्या शिकण्या- शिकविण्यासाठी आवश्यक असते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळ,संस्कृती/कला क्लब,पर्यावरण क्लब,कार्यकारी क्लब, सामाजिक सेवा प्रकल्प अशा प्रकारच्या विविध ठिकाणच्या भरपूर संधी देण्यात याव्यात.”
शैक्षणिक संस्थांमधील समुपदेशनाच्या व्यवस्थेचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले,” राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याद्वारे प्रत्येक शैक्षणिक संस्थेत ताण आणि भावनिक समायोजनासाठी समुपदेशन व्यवस्था असावी, असे नमूद केले आहे. त्याव्यतिरिक्त ग्रामीण पार्श्वभूमीवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जरुरीचा आधार देण्यासाठी पध्दतशीर व्यवस्था असावी,ज्यात हाॅस्टेल सुविधा वाढविण्याचा देखील अंतर्भाव आहे. सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमधून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतिच्या वैद्यकीय सुविधा मिळणे, सुनिश्चित केलेले असावे.
“मला नक्की वाटते, की आयआयटीतील शैक्षणिक नेतृत्व उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासोबतच याकडेही लक्ष पुरवत असणार .मला खात्री आहे, की ‘बंधू’ चा आरंभ हा आमच्या विद्यार्थ्यांना त्यांची भावनिक समृध्दी सुनिश्चित करत त्यांनी निवडलेल्या आपापल्या मार्गावरुन तणावमुक्त वाटचाल करण्यास मदत करेल,”असेही ते पुढे म्हणाले.
‘बंधू’ ची रचना आयआयटीतील समुपदेशक आणि बाह्य तज्ञ यांनी संयुक्तपणे तयार केली असून त्यात त्यांना डीन प्रा.टी कडू,(विद्यार्थी कल्याण), आणि प्रा.सुहास जोशी (माजी विद्यार्थी आणि सामूहिक संबंध) यांनी सहाय्य केले आहे. शैक्षणिक जीवनात येणाऱ्या काँलेज जीवनातील ताणापासून ,अभ्यासाचा तणाव ,आणि मानसिक आरोग्य या सारख्या सर्वप्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे सहाय्य करेल. बंधू मधे विविध वाचनीय लेख, माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास,तज्ञांचे पाॅडकास्ट्स,आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आवश्यक साधने यांचा समावेश आहे. बंधूची संकल्पना 1992 सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या 2017 साली झालेल्या रौप्य महोत्सवी पुनर्मिलनाच्या वेळी मांडली गेली. त्यांनी आयआयटी मुंबईला मदत करण्याची प्रतिज्ञा केली आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक समृध्दीत वृध्दी करण्याचे ठरविले. स्व-मदत संकेतस्थळ हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.ते या प्रकल्पाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करत आहेत. आपण अशा काळात आहोत, जिथे तणावामुळे त्रस्त व्हायला होते. “आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी, त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर होण्याची गरज आहे,”असे आयआयटी मुंबई चे संचालक प्रा.सुभाशिष चौधरी यावेळी म्हणाले,”या महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनातील ताण वाढला आहे. बंधू चा आरंभ वेळेवर जाहीर करण्यात आम्हाला आनंद होत आहे, असेही ते पुढे म्हणाले.
अनेक गोष्टी सुरवातीच्या टप्प्यात प्रभावीपणे हाताळता आल्या तर विद्यार्थ्यांना सहाय्य करून विद्यार्थ्यांना ही आव्हाने पेलणे शक्य होऊन, एकामागोमाग एक येणारी संकटे (डॉमिनो ईफेक्ट)टाळता येतात.त्याचप्रमाणे आयआयटी मुंबईतील आधार व्यवस्थेची मदत घ्यायची वेळ कोणती हे ही यामुळे लक्षात येईल,”असे आयआयटीच्या 1992च्या तुकडीतील माजी विद्यार्थिनी रेखा कोयता यावेळी म्हणाल्या.
प्रख्यात सिनेनिर्माता आणि आयआयटीचे माजी विद्यार्थी श्री. नीतेश तिवारी हे देखील या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.