नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा १० वा हप्ता 1 जानेवारी रोजी रिलीज होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 10वा हप्ता 1 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जारी करतील, अशी घोषणा त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12:30 वाजता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 10 वा हप्ता जारी करतील. यामुळे 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 20 हजार कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करता येईल.
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. या योजनेत आतापर्यंत १.६ लाख कोटींहून अधिक रक्कम शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आली आहे.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी सुमारे 351 शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) 14 कोटींहून अधिक इक्विटी अनुदान जारी करतील, ज्याचा फायदा 1.24 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होईल. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान एफपीओशी संवाद साधतील आणि देशाला संबोधितही करतील. यावेळी केंद्रीय कृषिमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.




