मुंबई : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदो याचा मंगळवारी अपघात झाला. या अपघातामध्ये सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहदेव दिरदोचा अपघात झाल्यापासून चाहते त्याची प्रकृती सुधारण्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. अपघातानंतर सहदेव बेशुद्धच होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा शुद्ध आली. आता सहदेवच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
सहदेवला रात्री उशिरा जगदलपूर येथील डिमरापाल रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. तथापि, सुकमा जिल्हा रुग्णालयातच सहदेवच्या डोक्याला 5 टाके टाकण्यात आले होते. दुसरीकडे जगदलपूरच्या डिमरापाल हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅननंतर सहदेवला 12 तास आयसीयूमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले होते. सहदेवची प्रकृती आता स्थिर असून तो बोलतही आहे. त्याच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे.
सध्या सहदेवच्या प्रकृतीवरचा धोका टळला आहे. सिटी स्कॅन अहवालातही कोणतीही गंभीर दुखापत नाही. मात्र, डिमरापाल रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने नातेवाइकांच्या विनंतीनंतर सहदेवला अधिक उपचारासाठी रायपूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे. जिथे पुन्हा एकदा त्याचे सिटी स्कॅन केले जाणार आहे. रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले की, रात्री उशिरापासून सहदेवला आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला रायपूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे.




