हरियाणा : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात काँग्रेस पार्टीच्या नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येच्या प्रकरणात एक आरोपी सचिन कानोडा याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असून, त्याने सांगितले की हिमानीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्यावर पैशांची मागणी केली. त्यानंतर, त्याने सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून हिमानीची हत्या केली.
सचिन आणि हिमानी यांची मैत्री एक वर्षापूर्वी सोशल मीडियावर झाली होती. सचिनने पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले की, हिमानीने त्याला तिच्या घरी बोलावले, तिथे दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, हिमानीने या सर्वाचा व्हिडीओ तयार केला आणि त्याच व्हिडीओच्या आधारे ती सचिनला ब्लॅकमेल करू लागली. सचिनकडून लाखो रुपये वसूल केल्यानंतरही ब्लॅकमेलिंग सुरूच होते. हिमानीने आणखी पैसे मागितल्यामुळे सचिनने अखेर तिची हत्या केली.
हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट:
हिमानीने सचिनला आणखी पैसे मागण्यासाठी घरी बोलावलं. सचिनने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनही पैशांची मागणी करत होती. त्यानंतर, सचिनने मोबाइल चार्जरच्या तारेने हिमानीचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर, तो तिचा मृतदेह घरी तसाच सोडून आपल्या दुकानात गेला. नंतर सचिन हिमानीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुन्हा तिच्या घरी परतला, मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि रिक्षाने, नंतर बसने मृतदेह सांपला स्टँडपर्यंत आणला. तिथे सुटकेस सोडून तो पळून गेला. काही तासांनी पोलिसांना एका बेवारस सुटकेसबद्दल माहिती मिळाली, ज्यात हिमानीचा मृतदेह आढळला.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आरोपी सचिनला अटक केली. सचिनने गुन्हा कबूल केला आहे, परंतु पोलिसांनी अजून अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. तपास सुरू असून, अधिक धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. सचिनच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील माहिती समोर आली आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. या प्रकरणामुळे हरियाणामधील राजकीय वातावरण तापले आहे. हिमानीच्या कुटुंबीयांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.