लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पाळीव कुत्र्याने स्वतःच्या मालकिणीलाच चावा घेतला. कुत्र्याच्या चाव्यामुळे मालकिणीला इतका राग आला की तिने कुत्र्याला निर्दयीपणे मारलं. त्यानंतर ती कुत्र्याचा मृतदेह तलावात टाकण्यासाठी गेली असता ती स्वत:ही पाण्यात बुडाली. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी कुत्र्याचा मृतदेह आणि मालकिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लखनऊच्या पीजीआय पोलीस स्टेशन क्षेत्रातील दलोना गावाशी संबंधित आहे. येथे रुबी नावाची महिला पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. त्यांचा पाळीव कुत्राही त्यांच्यासोबत येथे राहत होता.
पाळीव कुत्र्याने शनिवारी रुबीला चावा घेतला. याआधीही कुत्र्याने त्यांच्या मुलाला चावा घेतला होता. कुत्र्याच्या या कृत्यामुळे रुबीला राग आला. त्यानंतर तिने कुत्र्याची हत्या केली. त्यानंतर ती कुत्र्याचा मृतदेह फेकण्यासाठी घराजवळील तलावाजवळ गेली. बराच वेळ होऊनही रुबी घरी न परतल्याने पती तिला पाहण्यासाठी तलावाकडे गेला.
पतीने तलावाजवळ रुबीची चप्पल पाहिली. त्यांनी तातडीने गावकऱ्यांकडे मदत मागितली. ग्रामस्थांनी रुबीचा शोध सुरू केला असता त्यांना रुबीचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला. तात्काळ गावातील काही लोकांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनाही कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पतीचा जबाब घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पूर्व विभागाचे एडीसीपी सय्यद अली अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.