जयपूर : जयपूर पोलिसांनी आयआयटीयन बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंग याला ताब्यात घेतले आहे. अभय सिंगने सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करून, जयपूरच्या रिद्धी-सिद्धी भागातील एका हॉटेलमध्ये त्याला पकडले. यावेळी अभय सिंग याच्याकडे काही मादक पदार्थ, विशेषतः गांजा देखील सापडला आहे. पोलिसांनी हॉटेलच्या खोलीत झडती घेतली असता, तेथून गांजा आणि इतर अंमली पदार्थ मिळाले. त्यानंतर पोलिसांनी अभय सिंगला ताब्यात घेतले आणि शिप्रापथ पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिस अभय सिंगने आत्महत्येची धमकी का दिली, याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय सिंगवर आधीच काही गुन्हे दाखल आहेत का हे देखील तपासले जात आहे. त्याचप्रमाणे, त्याच्याकडे सापडलेल्या मादक पदार्थांचा स्रोत काय, याबाबतही पोलिसांना माहिती मिळवायची आहे. आयआयटीयन बाबा म्हणून ओळखला जाणारा अभय सिंग म्हणतो की, “थोडासा प्रसाद (गांजा) सापडला आहे. मी त्यांना सांगितले की जर तुम्ही यावर गुन्हा दाखल केला तर कुंभमेळ्यात इतके लोक तो पितात, तर त्या सर्वांना अटक करा. हे भारतात सामान्य आहे.”
या प्रकरणात एनडीपीएस (नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकॉट्रॉपिक सब्सटन्स) अधिनियम अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.