पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, आरोपीच्या वकिलाने हा बलात्कार नसल्याचा दावा केला होता, हे सर्व एकमेकांच्या सहमतीने झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, पोलीस तपासात अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. आता दत्तात्रय गाडेने तरुणीला ७५०० रुपये दिल्याचा दावा देखील खोटा असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासात आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे सापडण्याची शक्यता आहे.
आरोपी दत्ता गाडेने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. जेव्हा तरुणीने शिवशाही बसमध्ये प्रतिकार केला तेव्हा नराधमाने आक्रमक होत तिचा गळा आवळला. तेव्हा तरुणी प्रचंड घाबरली. तिला कोलकाता बलात्कार प्रकरण आठवलं, त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने त्याच्याकडे तिला न मारण्यासाठी गयावया केली. या घटनेने तिला मोठा धक्का बसला. पीडित तरुणीने संमतीने शरीर संबंध ठेवल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला. हे ऐकून पीडित तरुणी तणावाखाली असल्याची माहिती आता समोर आली आहे. तिला त्यासाठी दोन समुपदेशकांची मदत घ्यावी लागत आहे.
दरम्यान, आरोपीच्या पत्नीने सुद्धा उपस्थित केला होता कि, बलात्कार झाला तर मग तरुणीचे कपडे फाटले का नाहीत? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसत आहे का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का?
आरोपीच्या वकिलाने आरोपी मार्फत सांगण्यात आल्याप्रमाणे दावा केला होता की आरोपी आणि पीडिता साधारणपणे एक महिन्यापासून एकमेकांना ओळखतात. त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर त्याच्या आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले आहेत. यामध्ये कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आलेले नाही.
आरोपीच्या परिचित वकिलाने दत्ता आणि पीडिता यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली असता पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. आता दत्ता गाडे याच्या बँक अकाऊंट संदर्भात एक मोठी माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. अत्याचार झाला त्यादरम्यान आरोपी दत्ता गाडे याच्या बँक खात्यात फक्त २४९ रुपये आढळून आले आहेत. मग आरोपीच्या वकिलाने दावा केलेले ते ७ हजार ५०० रुपये कुठून आले? नराधम दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे बँक खाते, ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची चौकशी केली आहे. गाडे याच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले? संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले का? या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला. मात्र, पीडित तरुणी कधीच दत्ता गाडे याच्या संपर्कात नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. तसेच दत्तात्रय गाडे तरुणीला ७५०० रुपये दिल्याचा जो दावा करत आहे, तो देखील खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रकरणाचा तपास आता पुणे गुन्हे शाखेकडे
स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरणाचा तपास आता पुणे गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. यामुळे तपासाची दिशा अधिक सुस्पष्ट होईल आणि अधिक सक्षम पद्धतीने या प्रकरणाचा तपास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे, आणि त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होईल. यासह, घटनास्थळी, म्हणजेच रिकाम्या बसमध्ये फॉरेन्सीक पथकाने तपासणी केली असून, त्यात आरोपीचे केस आणि इतर महत्त्वाच्या वस्तू सापडल्या आहेत. या वस्तूंची डीएनए चाचणी करून संबंधित पुरावे तपासले जातील.
दत्तात्रय गाडेच्या वकिलाने केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या दाव्यावरही पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर त्याचा दावा फोल ठरला. अखेर वकिलाने पत्रकार परिषदेत यू-टर्न घेतला आणि सांगितले की, “आम्ही असे काहीही बोललो नव्हतो.” याशिवाय, वकिलाने पोलिसांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.