झारखंड : झारखंडमधील सरायकेला-खरसवान जिल्ह्यातील चांडिलजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात एका मालगाडीचे तब्बल २० डबे रुळावरून घसरले. या घटनेमुळे आग्नेय रेल्वेच्या चांडिल-टाटानगर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (आद्रा विभाग) विकास कुमार यांनी सांगितले की अपघातानंतर चांडिलपासून अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा तातडीने बंद करण्यात आली. या अपघातात दोन मालगाड्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
घटनास्थळी रेल्वे कर्मचारी आणि यंत्रणा तैनात असून, रुळावरून घसरलेले डबे हटवणे व खराब झालेले ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या व्यत्ययामुळे अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द, वळवण्यात किंवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. रद्द सेवांमध्ये 20894 पटना–टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस, 28181 टाटानगर–कटिहार एक्सप्रेस आणि 28182 कटिहार–टाटानगर एक्सप्रेसचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अद्ययावत वेळापत्रक व मार्गाबाबत अधिकृत स्रोतांकडून माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.




