माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. दानिश रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
डॉ. दानिश रिझवान यांनी या प्रकरणी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामविलास पासवान यांच्याशी संबंधित कोणत्या गोष्टी लपवल्या जात आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे दानिश रिझवान यांनी म्हटले आहे. दानिश रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांचं हसणं, वागणं याकडे बघता त्यांच्याकडे संशयाची सुई जाते, असे देखील रिझवान यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान हे रुग्णालयात उपचार घेत असताना कोणाच्या सांगण्यावरून रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जारी केले नाही, असा प्रश्न देखील दानिश रिझवान यांनी उपस्थित केला आहे.
रामविलास पासवान यांच्या मृत्यूबाबत असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे रामविलास पासवान यांच्या नातेवाईकांबरोबरच त्यांचे समर्थकही जाणू इच्छितात असे हिंदुस्तानी आवामी मोर्चाने पासवान यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे. त्यामुळे रामविलास पासवान यांच्या निधनाची न्यायिक चौकशी व्हायला हवी, असे हिंदुस्तानी आवामी मोर्चाने म्हटले आहे.