केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शनिवारी आणखी एका कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. ‘कोव्हॅक्सीन’ ही लस ‘भारत बायोटेक’ने देशात विकसित आणि उत्पादित केली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे.
‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यापाठोपाठ शनिवारी तज्ज्ञांच्या समितीने ‘कोव्हॅक्सीन’ लशीच्या आपत्कालीन वापरास काही शर्तीवर मंजुरी दिल्याची माहिती मिळाली आहे.
लसीकरण सुरू करताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरूच राहतील, त्यांबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही आणि पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्याचबरोबर आघाडीवर काम करणाऱ्या दोन कोटी कर्मचाऱ्यांचे विनाशुल्क लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. ५० वर्षांवरील आणि त्याखालील जोखमीच्या गटातील नागरिकांसह २७ कोटी नागरिकांना येत्या जुलैपर्यंत लस देण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.




