गुजरात : सध्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुजरातमध्ये सुरतचे उपमहापौर पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या वेळी वाटेत एका ठिकाणी चिखल होता, तो ओलांडण्यासाठी हे महाशय अग्निशमन अधिकाऱ्याच्या पाठीवर बसले. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, सुरतमध्ये पावसानंतर काही भागात पाणी साचले असताना भाजप नेते व उपमहापौर नरेंद्र पाटील पाहणीसाठी बाहेर पडले होते. त्यानंतर ते प्रत्यक्षात रस्त्यावर पोहोचले तेव्हा फूटपाथ आणि रस्ता यांच्यामध्ये २० फूट जागेत चिखल होता. चिखलात पाय खराब होऊ नयेत यासाठी उपमहापौर उप अग्निशमन अधिकाऱ्याच्या खांद्यावर बसून पलीकडे पोहोचले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चिखलात उपमहापौरांचे पाय घाण होऊ नये आणि पॅन्ट खराब होऊ नये, यासाठी त्यांनी सब फायर ऑफिसरची मदत घेत चिखल पार केला.
सुरत शहरातील लिंबायत भागातील मिठीखडी भागात पाणी साचले होते. पावसानंतर या भागातील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. खाडीची पाणीपातळी कमी झाल्याने काही ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळाला. अशा स्थितीत महापालिकेच्या आरोग्य पथकाने पदभार स्वीकारला. अनेक रस्ते बंद होते, जे पुन्हा खुले करण्यात आले. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे सुरत शहरातील काही भागात तीन जण पाण्यात बुडाले.




