जिनिव्हा : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना भारतातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि मृतांची संख्या चिंताजनक असून भारत सरकारने कोरोनाबाधितांची खरी आकेडवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी मुलाखतीत म्हटले कि, “इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूशन (IHME) यांनी ऑगस्टपर्यंत भारतात १० लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या भारताची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. भारतातील कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या ही दक्षिण-पूर्वेकडील देशांपेक्षाही जास्त आहे. भारताने आणि जगातील इतर देशांनीही कोरोनाबाधितांची आणि मृतांची खरी आकेडवारी जाहीर करण्याची आवश्यकता आहे. भारतात आढळलेला कोरोना विषाणूचा वेरिएंट अधिक जलदपणे फैलावत आहे. भारतात आढळलेला B.1.617 हा वेरिएंट जागतिक चिंतेचा विषय आहे.” अशा प्रकारचा हा चौथा वेरिएंट असल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले आहे.
डॉ. स्वामीनाथन पुढे म्हणाल्या की आपल्याला विज्ञान आणि डेटाच्या आधारे आपली धोरणे सतत बदलत राहावी लागतील. तसेच विशिष्ट निर्णय का घेतले जात आहेत आणि त्यामागील कारणे काय आहेत? याविषयी लोकांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांनी डब्ल्यूएचओ वैज्ञानिकांना देखील डेटामध्ये पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले.
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. या लाटेने देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर ताण निर्माण केला आहे आणि फ्रंटलाइन वैद्यकीय कर्मचार्यांवर देखील याचा खूप ताण पडत आहे.




