कराड : हिंदवी स्वराज्याच्या सातारा या चौथ्या राजधानीतील छत्रपती शिवाजीमहाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये येत्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात शिवाजीमहाराजांनी शौर्य दाखवले ती वाघनखे इंग्लंडच्या म्युझियममधून आणण्यात येणार आहेत. सातारच्या या वस्तू संग्रहालयात ही वाघनखे लोकांना पहायाला ठेण्यासाठी विशेष दालन सज्ज झाले आहे. जनतेच्या भावना जोडलेल्या हा ऐतिहासिक अनमोल ठेवा सलग १० महिने पहाण्यास उपलब्ध राहणार असून, त्याचे इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये अप्रूप राहणार आहे. ग्रील दरवाजा व सेंसर यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरा अशी वाघनख्याची चोख सुरक्षा व्यवस्था संग्रहालयाचे अधीक्षक प्रवीण शिंदे यांनी केलेली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व विशेष प्रयत्नांतून छत्रपती शिवरायांचे हे खास शस्त्र पुन्हा मायदेशी येणार आहे. त्यासाठी मंत्री मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव, संचालक, पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाच्या शिष्टमंडळाने लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय तसेच इतर संग्रहालयांना भेटी दिल्या होत्या. आणि शिवरायांची ही शौर्य, पराक्रमांनी गाजलेली वाघनखे भारतात आणण्याचा करार केला होता.
इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये शिवरायांची म्हणून असलेली ही वाघनखे छत्रपतींनी अफजलखान वधावेळी वापरलेली असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. पोलादीपट्टीवर पाच इंच अंतर व चार सव्वा इंच लांबीचे तीक्ष्ण वाघनखे व त्याला तिन्ही बाजूने शिरा, खालच्या बाजूला धार असलेले दोन्ही बाजूच्या अंगठ्या असणारी ही वाघनखे सध्या इंग्लंडच्या म्युझियममध्ये असून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वापर केला होता. असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे. ती वाघनखे या म्युझियमला मराठ्यांचा इतिहासकार ग्रँट डफ यांचा वंशज अँड्रियन ग्रँट डफ यांच्याकडून भेट म्हणून मिळाल्याचे सांगितले जात आहे.