अमरनाथ : ढगफुटी आणि खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जम्मूमध्ये थांबल्यानंतर अमरनाथ यात्रेकरूंची नवी तुकडी जम्मू बेस कॅम्पमधून निघण्यास सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 5 वाजल्यापासून जम्मू बेस कॅम्प येथून नवीन तुकडी पवित्र गुहेच्या दर्शनासाठी रवाना झाली. अमरनाथ यात्रेकरूंची एक तुकडी पहलगाम मार्गावरील नुनवान बेस कॅम्प येथून रवाना करण्यात आली आहे. बालटाल आणि नुनवान या दोन्ही बाजूंनी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध असेल. या दुर्घटनेनंतर सरकारने पुन्हा एकदा यात्रा सुरू केली आहे, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या यात्रेकरूंचा शोध सुरू आहे
अमरनाथ येथे शुक्रवारी आलेल्या पुरात बेपत्ता झालेल्या यात्रेकरूंचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पवित्र गुहेजवळ मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने यात्रा थांबवावी लागली. गुहेसमोर 10 फुटांपर्यंत मलबा साचल्याने यात्रा मार्गही उद्ध्वस्त झाला होता. सीआरपीएफ आणि इतर जवान प्रवाशांना सुरक्षितपणे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
या अपघातात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सुमारे 40 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 65 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लष्कराशिवाय बीएसएफ, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात सहभागी आहेत.




