नवी दिल्ली : भारतात पुन्हा कोरोना व्हायरसच्या संसर्गामध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने कोविशील्ड संदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्राने राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यास सांगितले आहे. एनटीजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशीनुसार या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवडे करण्यास सांगितले आहे.
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप आणि लस प्रशासनावरील नॅशनल एक्सपर्ट ग्रुपच्या सूचनेनंतर हे पत्र राज्यांना लिहिले गेले आहे. दुसरा डोस कोणत्याही परिस्थितीत 8 व्या आठवड्यात देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ही सूचना केवळ कोविशील्डवर लागू होणार आहे. सध्या भारतभर कोविशील्ड लसीचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जात आहेत. नवीन शिफारसींमध्ये असे म्हटले आहे की कोविशील्ड चा दुसरा डोस सद्य 28 दिवसांच्या अंतरांऐवजी 6-8 आठवड्यांनंतर दिला तर रोग प्रतिकारशक्ती आणखी वाढू शकते.




