उत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली एक कार सुमारे सातशे मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. मृतांमध्ये 10 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. एसयूव्ही उत्तराखंडमधील जोशीमठ येथून पल्ला जाखुला गावाकडे जात होती. या कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसलेले होते. 10 आसनी गाडीत 17 जण प्रवास करत होते. काहीजण कारच्या छतावर बसलेले होते, त्यांनी जीव वाचवण्यासाठी चालत्या वाहनातून उडी मारली पण त्यात तीन जण जखमी झाले तर दोघे थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी मोठी नाली बनविण्यात आलेली आहे. त्यामुळे रस्ता कच्चा आणि खडीमय झालेला आहे. शुक्रवारी दुपारी एक मॅक्स जोशीमठहून किमणा गावाकडे प्रवाशांसह जात होती. दुपारी 3:30 च्या सुमारास, मॅक्स पल्ला गावाजवळील एका उंच चढणीवर कार चढली नाही आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार मागच्या बाजूला घसरू लागली. कार मागे जात असल्याचे पाहून दोघांनी खाली उडी घेऊन टायरमागे दगड लावण्याचा प्रयत्न केला, परंतु, ओव्हरलोडमुळे गाडी दगड ओलांडून वेगाने खाली जाऊ लागली आणि खोल दरीत कोसळली. दरम्यान, कारच्या छतावर बसलेल्या तिघांनी जीव वाचवण्यासाठी उडी मारली. मात्र, रस्त्यावरील दगडावर आपटून ते जखमी झाले.
मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिन्ही जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र उरगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या रस्त्यावर वाहनांना परवानगी नाही
ज्या रस्त्यावर अपघात झाला त्या रस्त्यावर वाहनास परवानगी नाही. 2020 पासून 11 किलोमीटर लांबीच्या उरगम-पल्ला जाखोला रस्त्याचे काम सुरू आहे. अपघातापूर्वी एसयूव्ही चेकपोस्टवरून देखील गेली होती, मात्र इथे कोणीही त्यांना अडवले नाही.