लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचे सोमवारी मध्यरात्री कोरोनाने निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. भारताकडून ऑस्करसाठीही या सिनेमाला नामांकित करण्यात आले होते.
वर्धा जिल्ह्यातील जोगीनगर येथे गरिब कुटुंबात वीरा लहानाचे मोठे झाले. वीरा यांचे वडील नागपुर येथील रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करायचे तर आई बांधकाम मजूर म्हणून राबायची. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वीरा साथीदार यांच्यावर पगडा होता. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली आहेत. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले.
‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. त्यांची व्याख्यानं विशेष गाजली होती. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यांनी पत्रकार म्हणूनही अनेक वर्ष काम केलं. तसेच ते गीतकारही होते.




