Work on expanding medical facilities immediately after imposing strict restrictions in the state
महाराष्ट्र मुंबई

राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर काम करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससह ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती () तयार करण्यात येईल.

आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊ, पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल, आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही बैठकीत चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले. यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी देखील बोलताना आपण रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडेसिवीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली.

टास्क फोर्सने दिल्या सूचना :

  1. ९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी.
  2. सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी.
  3. मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे.
  4. डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत.
  5. तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे, त्याचे नियोजन करावे.
  6. ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त दिला जाऊ नये यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे.
  7. मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे.
  8. एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे आदि सूचना करण्यात आल्या.

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न :

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १२०० मेट्रिक टन पैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतुकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही ते म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत