महाराष्ट्रात वारंवार सांगूनही कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात नाही. यामुळे कोरोना रुग्ण आणि मृत्यू दोन्ही वाढतील हे लक्षात घ्या, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. जास्तीतजास्त चाचण्या वेळेत केल्यास रुग्णांचा लवकर शोध लागू शकतो तसेच त्याची जीवही वाचू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून कळवले आहे.
लक्षणे असलेल्या व अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचे देखील अपर सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच अँटीजेन चाचणीसाठी स्वॅब घेतानाच दोन स्वॅब घ्यावे जेणेकरून काही शंका आल्यास आरटीपीसीआर चाचणीही करता येईल व रुग्णाला पुन्हा चाचणीसाठी यावे लागणार नाही. दुर्दैवाने त्याचीही अंमलबजावणी महाराष्ट्रात होताना दिसत नाही.
महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटीपेक्षा जास्त असून आतापर्यंत ५८ लाख ७२ हजार चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये १२ लाख आठ हजार लोकांना म्हणजे २०.५८ टक्के लोकांना कोरोना झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी व उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारने नेमलेल्या ‘राज्य टास्क फोर्स’ने यापूर्वीच आपल्या अहवालात राज्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यास सांगितले होते.
महाराष्ट्रात ५३९ कोरोना चाचणी प्रयोगशाळा असून यापैकी २१८ प्रयोगशाळेत १०० पेक्षा कमी चाचण्या केल्या जातात. या प्रयोगशाळांच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला जावा. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमणे त्यांच्या शिफ्ट पासून योग्य व्यवस्थापन करण्यासही सांगण्यात आले आहे.
टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, कोरोना चाचणी लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईत किऑक्स प्रत्येक वॉर्डात उभारण्याची शिफारसही आम्ही केली होती. याठिकाणी लोकांनी जाऊन आपले स्वॅब द्यायचे होते. या केंद्रात केवळ स्वॅब गोळा केले जाणार होते व तेथून ते प्रयोगशाळेत नेण्याची कल्पना होती. परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही.
मास्क, सोशल डिस्टसिंग व सॅनिटाइजरचा वापर हे कोरोनाला रोखण्यासाठी प्रमुख शस्त्र असले तरी आज त्याबाबतही राज्यात कोठेच धड अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या करा हे वारंवार सांगूनही त्यावरही ठोस निर्णय होत नाही, असे राज्याचे प्रमुख आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.




