कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाविषयी उद्धव ठाकरे म्हणाले, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. ज्यांच्याकडे याविषयी काही माहिती असेल किंवा काही पुरावे असतील त्यांनी मुंबई पोलिसांना येऊन द्यावे. महाराष्ट्र पोलिस हे प्रकरण हातळण्यास सक्षम आहे.
लॉकडाऊनमुळे बंद असलेली मुंबईची लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मुंबईची लोकल आजही सुरू आहे. लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. मुंबईतील लोकल वाहतूक सुरु करायची की नाही हे राज्य सरकारच्या हातात नाही, याबाबतचा अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. राज्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी लोकल सुरू करा यासाठी आम्हाला चार-पाच वेळा केंद्र सरकारला विनंती करावी लागली.




