मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले कि, भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल 5 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने सुरू असून सन 2030 पर्यंत हे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यापीठ ही मोठी शक्ती आहे. त्यामुळे विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता आणि सुलभता याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करावा. त्या त्या भागातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अधिकाधिक सुलभता आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी आहेत. विद्यापीठ/ महाविद्यालय यांच्या अहवालातील, निरीक्षण, सूचना, उपाययोजनांची माहिती जनतेला पाहता आली पाहिजे. राज्य शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले आहे. त्यातले बदल आपण स्वीकारून गती द्यावी, यासाठी ऑनलाईन पद्धती विकसित करून डॅशबोर्ड तयार करावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.