मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी राज्यपालांनी राज्य शासनाच्या कामाचा आढावा मांडला. राज्यपालांनी कोरोना योध्दांना अभिवादन करत अभिभाषणाला सुरुवात केली. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
‘औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगलं काम केलं. रोजगार सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब पोर्टल सुरु केलं आहे. राज्य सरकारने आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली,’ अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. तसंच कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवादाबाबत सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत आहे, असंदेखील राज्यपाल म्हणाले.
राज्यपाल राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत म्हणाले कि, “धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केलं आहे. कोरोना संदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तसंच, राज्य सरकारने कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळाही वाढवल्या आहेत. सरकारकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवण्यात आली. हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. विशेष सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनाची लढाई अजून सुरुच असून मी जबाबदार ही मोहीम सुरू आहे. केंद्राकडे राज्यात लसीचा कोटा वाढवण्यासाठी पाठपुरवठा केला जात आहे.” तसंच कोरोना संदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे, असंही यावेळी राज्यपालांनी सांगितलं.




