बुलढाणा : बुलढाण्यातील मलकापूर येथील सर्वधर्मीय स्मशानभूमीत दफन केलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांकडून उकरुन काढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कुत्रे दफन केलेले मृतदेह उकरुन ते रस्त्यावर आणत आहेत. अशा प्रकारे मृतदेहांची अवहेलना होत असल्याने संताप व्यक्त केला जात असून सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करण्यात येत आहे.
मलकापूर शहरात नदी काठावर माता महाकाली वॉर्ड परिसरात असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीतील हा प्रकार आहे. या स्मशानभूमिमध्ये सर्वधर्मिय मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. काही मृतदेह दफनही केले जातात. मात्र कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने सध्या स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली आहे. कमी जागेत दफनविधी करण्यात येत आहे. अशातच परिसरातील भटके कुत्रे स्मशानभूमीत पुरण्यात आलेले मृतदेह उकरुन काढत आहेत. तसंच हे मृतदेह फरफटत नेण्याचाही प्रकार घडत आहे. याशिवाय काही प्रेतांचे लचके तोडण्याचीही बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांकडून स्मशानभूमीत सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करण्यात येत आहे.




