राज्य सरकारनं खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या 12 लाख 50 हजार किट्स या सदोष आढळून आल्या होत्या. मात्र या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचालयानं खरेदी केल्या असल्याचं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हात झटकले होते. त्यावर आज अमित देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंनी हे वक्तव्य केल्याचं म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते जालना दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. सदोष किट्स वितरित करणाऱ्या GCC Biotech ltd कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं होतं. तसेच GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला असून सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.
सदोष पीसीआर किट्स प्रकरणी एका समितीची स्थापना केली असून याचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.




