अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च पासून शिर्डी साई मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिरात येणाऱ्या दानाला मोठा फटका बसल्याने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. यातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या संकटात नर्सिंग स्टाफमध्ये कार्यरत असताना त्यांच्याही पगारात कपात करण्यात आलीय. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आज भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगारांची बैठक घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उच्च न्यायालयाने संस्थानचा अंतरिम कारभार पाहण्यासाठी तदर्थ समितीची नियुक्ती केली आहे. समितीचे अध्यक्ष इथे न्यायाधीश नाहीत तर संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांना कामगार व लोकप्रतिनिधींनाही भेटण्यास वेळ नसेल तर त्यांनी पदावरून दूर व्हावे अशी मागणी विखे यांनी करताना समितीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी संस्थान कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. गुरूवारी ग्रामस्थ घंटानाद व महाआरती करतील. यानंतरही समितीच्या धोरणात फरक पडला नाही तर आपण कामगारांच्या बरोबर लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचेही विखे यांनी जाहीर केले आहे.




