मुंबई : रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतर एनसीबीने तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली तरी हा मुद्दा सिद्ध करणे एनसीबीसाठी आव्हानात्मक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रियाने रक्त तपासणी करुन घेण्याची तयारी दाखवली आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्यास रक्ताच्या तपासणीत काही आढळणे कठीण आहे. रक्त तपासणीचा अहवाल सुटका करुन घेण्यासाठी वापरणे शक्य आहे.
एनसीबीने मोबाइल चॅटच्या आधारे रियाला प्रश्न केले. चॅट बाबत रियाने उलटसुलट उत्तरं दिली. वेगवेगळी उत्तरं देऊन एनसीबीच्या तपासाची दिशा भरकटावी यासाठी तिने प्रयत्न केला. याआधी शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत या तिघांनी रियासाठी अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली.
रियाकडून पुरेशी माहिती मिळाली नसल्यामुळे तिला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याचे एनसीबीने सांगितले. अंमली पदार्थ प्रकरणी आतापर्यंत दीपेश सावंत, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह सातजणांना अटक झाली आहे. यापैकी दीपेश, शौविक, सॅम्युअल, जैद यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू आहे. एनसीबी सोमवारी रियाची अटकेतील आरोपींसमोर बसवून चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.