पुणे : महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 55 वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला होता. तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
झिका आजाराची लक्षणे :
झिका आजाराचा अधिशयन कालावधी निश्चितपणे किती आहे याबद्दल सुस्पष्टता नाही. तथापि, तो काही दिवसाचा असावा असे दिसते. बहुसंख्य रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नसली, तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्युचे प्रमाणही नगण्य आहे.
काय काळजी घ्याल?
- घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.
- घरामध्ये व परिसरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये व उघडे ठेवू नये
- हा आजार संसर्गजन्य नाही.
- झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.
- घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
- ताप आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.




