पुणे : रक्षक चौकात संध्याकाळी 5 च्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. काही मित्रांच्या गटाने त्यांच्याचबरोबर असलेल्या एकाला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर अवघ्या दोन तासांत, पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. सागर शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा जुनी सांगवी येथील आहे. तर योगेश जगताप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी घटनाक्रमाची माहिती दिली आहे. सागर शिंदे आणि आरोपी योगेश जगताप हे एकाच गाडीतून रक्षक चौकात आले असता त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर आरोपीने पिस्तुल काढून सागरवर गोळी झाडली, त्यात त्याचा मृत्यू झाला. औंध-रावेत बीआरटी मार्गावरील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या नजीकच्या भागात ही संपूर्ण घटना घडली. त्यानंतर, आरोपी वाहनातून खाली उतरून रक्षक चौकाकडे निघाले, तेथे त्यांनी एका मोटारसायकलस्वाराला अडवत त्याची मोटारसायकल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना एकत्रित करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, योगेश जगताप याला पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या अवधीत पकडले. सद्यस्थितीत, या गंभीर कृत्यामागील हेतू अस्पष्ट असून पोलिस चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी २०१३ मध्ये चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात सागर शिंदे याचा खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.




