पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातानंतर आता या प्रकरणात नवा वाद उफाळला आहे. या अपघातात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आयसीयूतून बाहेर आले असून तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र, या अपघातानंतर गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंब यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे.
गौतमी पाटील हिने काल पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला की, “मी त्या लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाही. मला इकडून तिकडून खबरी येत आहेत. त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाही. मदतीची मागणी करण्यासाठी त्यांचा एकच आकडा नाही. मध्येच ते 19 लाखांची मागणी करतात, नंतर 20 लाख, आता 10 लाख म्हणणार, असा त्यांचा आकडा आहे. माझ्या भावांपर्यंत आकडे येत आहेत आणि ते माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. माझा मानलेला भाऊ आहे. त्याच्याकडे पैशांची मागणी मरगळे कुटुंबांनी केली.”
या वक्तव्यानंतर आता जखमी रिक्षाचालक मरगळे यांच्या कन्या अपर्णा मरगळे यांनी गौतमी पाटीलचा चांगलाच समाचार घेतला आहे. “गौतमी पाटील आमच्या गरिबीची थट्टा करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमध्ये कमालीची विसंगती आहे. गौतमी पाटील हिने आमच्या गरिबीची थट्टा उडवली आहे. गौतमी पाटील कधी म्हणतात की, आमच्याकडे पैसे मागितले आणि कधी म्हणतात की त्यांना कायद्याने जायचं होतं. त्यांच्या दोन्ही वाक्यांमध्ये कमालीची विसंगती दिसत आहे. तुम्ही एकदा ठरवा नक्की काय बोलायचं आहे आणि तुमचा हा मानलेला भाऊ नक्की कोण आहे, तुमचा कोणता भाऊ आमच्यापर्यंत आला, हे सगळ्या महाराष्ट्राला एकदा सांगून द्या. एकीकडे तुम्ही म्हणतात की मी माझ्या मानलेल्या भावाला सांगितलं होतं ते जे मागतील ते देऊन टाका आणि दुसरीकडे जर आम्ही 19 लाखांची मागणी केली होती तर मग तुम्ही का नाही ते देऊन टाकले हे सुद्धा स्पष्ट सांगा. तुम्ही दोन्ही बाजूने बोलत आहात. तुम्ही आमच्यावर खबऱ्या ठेवत आहात का?” असा सवाल अपर्णा मरगळे यांनी केला.
गौतमी पाटील यांनी पुढे असेही म्हटले होते की, “मला कितीही कामे असली तरी मी वेळ काढून गेले असते, पण समोरून अनपेक्षित उत्तरे मिळाल्याने मी जाणं टाळलं. मी सुद्धा गरिबीतून बाहेर आले आहे आणि संकटांना सामोरी गेले आहे.”
यावर प्रत्युत्तर देताना अपर्णा मरगळे म्हणाल्या,
“गौतमी पाटील यांनी ना आमच्याशी संपर्क साधला, ना माणूस म्हणून काही नैतिकता दाखवली. आता त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. मी न्यायासाठी लढत आहे आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार आहे.”
या परस्परविरोधी आरोपांमुळे आता गौतमी पाटील – मरगळे कुटुंबातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.