पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी होणारा पुणे दौरा शहरातील मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) सूत्रांनी याबाबत पुष्टी केली असून पुण्यात अतिवृष्टीच्या अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
शहरातील इतर विकासकामांसह पुणे मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार होते. मात्र, पुणे आणि आजूबाजूच्या भागाला बुधवारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने वाहतूक ठप्प झाली होती आणि मोदींच्या दौऱ्यासाठीच्या मॉक ड्रीलमुळे रस्ता बंद झाला होता. बुधवारी पुण्यात 130 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आणि गुरुवारीही पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी बुधवारी रात्री अतिवृष्टीचा इशारा दिल्याने गुरुवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले.




