पुणे : पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आल्यानंतर पुण्यात उभारलेलं मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका समर्थकाने औंध परिसरात मोदी मंदिराची उभारणी केली होती. पण आता पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर उभारलं होतं. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.




