पुणे : कात्रज येथे जुन्या भांडणातून दोन भावांवर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिर रस्त्यावरील शांती मंदिराच्या भिंतीजवळ मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तुषार सुरेश जाधव (वय-26 रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत रेणुसे, ओंकार पवार, प्रथमेश येणपुरे आणि इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी 307, 323, 504, 143, 144, 147, 148, 149 सह महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला असून संकेत रेणुसे याला अटक केली आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार जाधव यांना फटाक्यांची ऑर्डर मिळाली होती, ते त्यांचा भाऊ मयुर जाधव याच्यासोबत फटाके देण्यासाठी जैन मंदिर येथून चालले होते. त्यावेळी आरोपी संकेत रेणुसे याने फिर्यादी यांचा भाऊ निखील जाधव याच्यासोबत 2019 मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली. संकेत रेणुसे याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेला भाऊ मयुर याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तुषार आणि मयुर जाधव जखमी झाले.
तुषार यांनी बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर संकेत रेणुसे याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.




