पुणे : SWaCH सहकारी संस्थेशी संलग्न कचरा वेचक शालन लक्ष्मण वायले यांनी प्रामाणिकपणाचे एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. कचरा वर्गीकरण करताना सापडलेली लग्नाची सोन्याची अंगठी त्यांनी कोणताही संकोच न करता मूळ मालकिणीला परत केली.
२२ डिसेंबर २०२५ रोजी कसबा विश्रामबाग वाडा परिसरात घरोघरी कचरा संकलनाचे काम पूर्ण केल्यानंतर, गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करत असताना शालन वायले यांना एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी आढळून आली. अंगठीचे मूल्य लक्षात येताच त्यांनी ती सुरक्षित ठेवली आणि संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून ती परत केली.
गेल्या दहा वर्षांपासून शालन वायले जयश्री जगदाळे यांच्या घरातून नियमितपणे कचरा संकलन करतात. ही अंगठी जयश्री जगदाळे यांच्या सून प्रियांका जगदाळे यांची असून ती त्यांच्या लग्नाची अंगठी होती. स्वयंपाक करताना अंगठी काढून कागदात गुंडाळल्यानंतर ती चुकून घरातील कचऱ्यासह फेकली गेली. अंगठी हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि शालन वायले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ आणि पूर्ण प्रामाणिकपणे अंगठी परत केली.
या घटनेविषयी बोलताना, पुण्यातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका जयश्री जगदाळे म्हणाल्या, “अंगठीचे आर्थिक मूल्य महत्त्वाचे नसून तिच्याशी जोडलेल्या भावना अधिक महत्त्वाच्या आहेत. ती माझ्या सुनेची लग्नाची अंगठी आहे. माझ्या संपूर्ण शिक्षण कारकिर्दीत मी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवले आणि आज ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.”
शालन वायले यांच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन जयश्री जगदाळे यांनी त्यांचा साडी देऊन सन्मान केला. कचरा वेचकांची सचोटी ही SWaCH संस्थेच्या मूलभूत मूल्यांचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यापूर्वीही SWaCH कचरा वेचक अंजू माने यांनी रस्त्यावर सापडलेली सुमारे १० लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग मालकाला परत केली होती. अशा घटनांमुळे गेल्या २० वर्षांत SWaCH कचरा वेचक आणि पुणेकर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलन सेवा देणाऱ्या कचरा वेचकांची प्रामाणिकता ही दररोज समाजासमोर येत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पुणे : कचरा गोळा करणाऱ्या महिलेने रस्त्यावर सापडलेली १० लाख रुपयांची बॅग केली परत




