पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मृत मुलाचे नाव आर्यन जाधव असे असून ही घटना दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात, सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर घडली. आर्यनची आई याच ठिकाणी मजूर म्हणून काम करत होती. काम सुरू असताना आर्यन रस्त्याच्या कडेला खेळत होता.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डांबरीकरण करत असलेला रोड रोलर अचानक भरधाव वेगाने मागे घेतला गेला. आवश्यक ती खबरदारी न घेता रोलर चालवण्यात आल्याने आर्यन थेट रोलरखाली सापडला. काही क्षणातच त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर रोड रोलरचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डांबरीकरण सुरू असताना संबंधित रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला नव्हता. काम सुरू असल्याचे कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षात्मक उपाययोजना ठिकाणी नव्हत्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किंवा ठेकेदाराकडून कामावर कोणतीही देखरेख ठेवण्यात आली नव्हती.
अपघातानंतरही बराच वेळ संबंधित ठेकेदार, सुपरवायझर किंवा जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून फरार रोड रोलर चालकाचा शोध घेतला जात आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधींनी केली आहे.




