मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध चांगले प्रयत्न करत असल्याचे म्हणत कौतुक देखील केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा मुद्दा पंतप्रधांनापुढे मांडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती पंतप्रधानांकडे केली. याबरोबर महाराष्ट्र ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी काय करत आहे, याची माहिती देत मुख्यमंत्र्यांनी विविध उपाययोजनांबाबत सांगितले. राज्याने करोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली असून त्यासाठी कसे नियोजन सुरू आहे, बेड, रेमडेसिवीर आणि इतर औषधे, तसेच ऑक्सिजनची उपलब्धता याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली.
केंद्र सरकारने विकसित केलेले कोविन हे अॅप सुरळीत चालत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारचे स्वत:चे अॅप विकसित करण्याची परवानगी मागितली आहे.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.




