मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळीच ठाण्यात आणि त्यानंतर पुण्यात पोलिसांनी केतकी चितळे हिच्यावर गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. ठाणे आणि पुण्यात या तक्रारींच्याआधारे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळेविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतकी चितळे हिच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार #ketakichitale ला घेतले ताब्यात #केतकीचितळे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2022
काय आहे प्रकरण?
अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली आहे. केतकीने ही कविता शेअर केल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कळवा, मुंबईसह इतर ठिकाणी केतकी विरोधात तक्रारी दाखल केल्या.




