मुंबई : राज्यातील महाविद्यालये उद्या (15 फेब्रुवारी) सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिली आहे.
स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय देईल, असं शासन निर्णयात सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरु करता येतील यावर निर्णय घेऊ, असं सांगितलं आहे.
मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वसई विरार, पनवेल , पालघर या क्षेत्रात महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने परावनगी दिल्यानंतर या भागातील महाविद्यालय उद्या राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा पालन करत सुरू होणार आहेत. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालय सुरू करण्याबाबत कळवले नसल्याची माहिती मिळाली आहे.




