नागपुर : नागपुरात शुक्रवारी रात्री एका विद्यार्थ्याने पेट्रोल पिऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शिवम कटरे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो BCA द्वितीय वर्षात शिकत होता. आत्महत्या केल्यानंतर सदरील तरुणाला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम मोरेश्वर कटरे (रा. दाभा) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो सेंट फ्रान्सिस डिसेल्स (एसएफएस) महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. तो बीसीए द्वितीय वर्षात शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आला होता. मात्र, परीक्षा संपल्यावर तो महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेला आणि त्यानंतर त्याने उडी घेतली. अचानक तो खाली पडल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
दरम्यान मित्रांनी त्याला तात्काळ एलेक्सीस रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. शिवमचे वडील मोरेश्वर कटरे (वय 46) हे इलेक्ट्रिशियन आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. त्याने मित्रांशीही बोलणे जवळपास बंद केले होते. आज तो एकटाच महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याने उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तो पेट्रोल पिला होता, अशीदेखील माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.




