Pimpri Murder: Businessman Nitin Gilbile Shot Dead by Friends Over Land Dispute in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात मित्रच ठरले शत्रू! व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या

पुणे : पुणे शहर आणि परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये आणखी एक भीषण घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे. पिंपरीतील वडमुखवाडी परिसरात मित्रांनीच एका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही घटना अलंकापुरम 90 फुटी रस्ता, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी घडली. नितीन शंकर गिलबिले (वय 37) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जमीन व्यवहारातील वादातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गिलबिले हे बुधवारी सायंकाळी काही मित्रांसोबत अलंकापुरम रस्त्यावरील एका शेडजवळ उभे होते. त्यावेळी त्यांचे मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्युनर कारमधून तिथे आले. त्यांनी नितीन यांना बोलावून कारमध्ये बसवले आणि हॉटेलच्या दिशेने नेले. काही वेळातच संशयितांनी नितीन यांच्या डोक्यात गोळी झाडली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस ठाण्याचे पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवाजी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपींच्या अटकेसाठी पथके तयार करण्यात आली असून त्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.

नितीन गिलबिले हे गेल्या काही वर्षांपासून जमिनीची प्लॉटिंग, हॉटेल व्यवसाय आणि व्यावसायिक गाळे भाड्याने देण्याच्या कामात गुंतले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अलंकापुरम रस्त्यावर स्वतःचे हॉटेल सुरू केले होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील आणि भाऊ असा मोठा परिवार आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गिलबिले आणि आरोपी अमित पठारे तसेच विक्रांत ठाकूर हे तिघेही एकत्रितपणे जमीन व्यवहाराचा व्यवसाय करत होते. याच व्यवहारातून उद्भवलेल्या पैशाच्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, हत्येमागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून बीएनएस आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली दिघी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दिघी पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत