नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चक्काजाम आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून आज (26 जून) जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून मोठी घोषणा केली. ते म्हणाले की “माझ्या हाती सत्तेची सूत्रे आली तर चार महिन्यांत ओबीसी आरक्षण देईन आणि देता आले नाही तर राजकीय संन्यास घेईन.”
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अशा अटकेने जनतेचा हा आक्रोश दाबता येईल असे ठाकरे सरकारने समजू नये
ओबीसींना त्यांचा हक्क मिळेपर्यंत हा लढा निरंतर चालू राहील#OBCvirodhiMVA pic.twitter.com/3WoDVAlKXn
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 26, 2021
नागपूरमधील व्हरायटी चौकात भाजपच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “स्वत:च्या अपयशाचं आणि नाकर्तेपणाचं खापर राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडत आहे. स्वत:ला काही करता येत नाही आणि दुसऱ्याला दोष देतात. उद्या बायकोनं मारलं तरी हे मोदींवर आरोप करतील.” अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली. ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ‘ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे लोकांना कळलं पाहिजे. वाशिममधील काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी आरक्षणाच्या विरोधात याचिका केली होती, असा आरोप फडणवीसांनी केला. त्यावेळी सरकारच्या वतीने भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे न्यायालयात लढले, असं ते म्हणाले.
‘ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचं काम ७० वर्षांनंतर मोदी सरकारनं केलं. काँग्रेसनं किंवा राष्ट्रवादीनं हे काम केलेलं नाही. ओबीसींसाठी वेगळं खातं मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं केलं. वेगळी आर्थिक तरतूद केली. राज्यातील आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेत्यांना अजिबात महत्त्व नाही. एखाद्या ताटात चटणी, कोशींबीर, लोणचे असते, तितकंच महत्त्व यांना आहे. ते खासगीत काय बोलतात हे तुम्हाला सांगू शकत नाही. पण राजकीय नाईलाजामुळं त्यांच्या राजकीय मालकांनी सांगितलं तितकंच ते करतात. फेब्रुवारीत निवडणुका होणार आहेत, ८५ टक्के महाराष्ट्र निवडणुकीला सामोरा जाणार आहे, तोपर्यंत हे आरक्षण होऊ द्यायचं नाही. ओबीसींना वंचित ठेवायचं, असं हे कारस्थान आहे. ते कारस्थान उधळून लावण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजपचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. ही आरपारची लढाई आहे, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.




