पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने (FDA) पुण्यात कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे. सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त करण्यात आला आहे. ५ सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि आयुक्त परिमलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त रुपाली खामणे, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात व सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
#अन्नवऔषधप्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक,#पुणे येथील सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई करून २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त केला.(१/२) pic.twitter.com/Fli1uaLIOM
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) September 13, 2022
अन्न व औषध प्रशासन विभागाने कारखान्यावर छापा टाकला असता अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा वापर करुन बनवलेले बनावट पनीर ताब्यात घेण्यात आले. तपासणीसाठी नमुने घेत २ लाख ३९ हजार ८०० रूपये किमतीचे १ हजार १९९ किलो पनीर, १८ लाख ७१ हजार ६५२ रूपये किमतीचे ४ हजार ७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ लाख ५३ हजार ६७५ रूपये किंमतीचे १ हजार ४८ किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण २२ लाख ६५ हजार २१७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. घेतलेले नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.




