नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या पलीकडे असलेल्या मजूर वस्तीमध्ये अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थलांतरित मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा असे असून ती मूळची मध्यप्रदेशातील सेलमिया गावाची रहिवासी होती. कामाच्या शोधात ठेकेदारामार्फत तिचे कुटुंब नागपुरात आले होते. नरसाळा गावाच्या मागील बाजूस, स्मशानभूमीजवळ नाल्याच्या पलीकडे असलेल्या झोपडपट्टीत हे कुटुंब वास्तव्यास होते. या परिसरात बाहेरगावाहून आलेले अनेक मजूर कुटुंबांसह राहतात.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली असावी. अनुष्का आपल्या आईसोबत झोपलेली असताना अज्ञात प्राण्याने तिला उचलून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळाने मुलगी दिसून न आल्याने कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर झोपडपट्टीजवळच काही अंतरावर छिन्नविछिन्न अवस्थेत अनुष्काचा मृतदेह आढळून आला.
हल्लेखोर प्राण्याने चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडल्याचे स्पष्ट झाले असून तिच्या शरीराचा सुमारे ३० ते ४० टक्के भाग, विशेषतः छाती व हात प्राण्याने खाल्ल्याचे आढळून आले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर अंधार असून रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने या अंधाराचा फायदा घेत ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. परिसरात कुत्रे, डुकरे तसेच अन्य वन्यप्राणी वावरत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
या घटनेनंतर मजूर वस्तीत भीतीचे वातावरण पसरले असून अनेक कुटुंबांनी रात्री जागून पहारा देण्यास सुरुवात केली आहे. हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच वनविभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली असून संभाव्य धोकादायक प्राण्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे बाहेरगावाहून कामासाठी आलेल्या मजुरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने प्रकाशव्यवस्था, सुरक्षा उपाय आणि आवश्यक प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




