नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी तसेच वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आहे.
गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. दरम्यान अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सांगितले होते की अनिल देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपयांचा हप्ता किंवा खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसंच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया, नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता. त्यानंतर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज (25 जून) ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे.




