मुंबई : मुलुंड येथे एका पित्याने ‘फादर्स डे’च्या दिवशी आपल्या गतिमंद मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या मृत्यूनंतर गतिमंद मुलाचा सांभाळ कोण करेल? या चिंतेने ग्रासल्यामुळे वडिलांनी हे कृत्य केले. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत याबाबत सांगितले आहे. योगेश भट्ट (३५) असे मृत मुलाचे नाव असून दशरथ भट्ट (६७) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडच्या योगी हिल्स परिसरातील एका इमारतीमध्ये दशरथ, त्यांची पत्नी आणि मुलगा योगेश राहत होते. दशरथ यांना तीन मुली आणि एक मुलगा असून तिन्ही मुलींची लग्न झाली आहेत. रविवारी सकाळी दशरथ यांची पत्नी बेडरूममधून उठून बाहेर आली असता तिला पती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर या महिलेने योगेशचा शोध घेतला, त्यावेळी तो पाण्याच्या ड्रममध्ये आढळला. या घटनेमुळे दशरथ यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. महिलेने याबाबत शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुलुंड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मुलुंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून यामध्ये दशरथ यांनी या कृत्यामागील कारण आणि घटनाक्रम लिहून ठेवला होता. त्यांचा मुलगा योगेश जन्मापासून गतिमंद होता, त्यामुळे त्याची सर्वच कामे इतरांना करावी लागत होती. आपलंही वय होत आलं असून आपल्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचा सांभाळ कोण करणार, या काळजीने त्यांना ग्रासले होते. त्यामुळे त्याला मारून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले आहे. त्यांनी शनिवारी रात्री पत्नी आणि मुलाला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर दोघेही गाढ झोपल्यानंतर त्यांनी योगेशला बेडरूमबाहेर आणून पाण्याच्या ड्रममध्ये बुडवले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर दशरथ यांनी हॉलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.




