मुंबई : राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. दरम्यान, आक्रमक झालेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांच्या विरोधातही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावल्याचा आरोप या तक्रारीतून राणांनी केला आहे.
राणा दाम्पत्याच्या तक्रारीत नमूद मुद्दे
- उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांविरोधात तक्रार
- घराखाली गोंधळ घातलेल्या ५०० ते ६०० शिवसैनिकांविरोधातही तक्रार
- घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी शिवीगाळ आणि धमक्या दिल्या
- बॅरिगेड्स तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला
- जीवे मारण्याच्या उद्देशाने शिवसैनिक घरात घुसले
- उपस्थित जमावाच्या हातात हत्यारं सदृश्य वस्तू असल्याच्या आरोप
- मुख्यमंत्र्यांसहित राऊत आणि परबांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला
- राऊतांनी शिवसैनिकांना चिथावणी दिली
- सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणातील कलमं लावण्याची मागणी
राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कलम १५३ (अ, ब) अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राणा दाम्पत्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल. समाजात तेढ निर्माण होईल असं वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. खार पोलिस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत.




