सातारा : नागठाणे गावात राहणाऱ्या एका मुलाने किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाच्या आईने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला. पण यामुळे मुलाला प्रचंड राग आला. त्याने आईला पंजाबी ड्रेस घालू नको, साडी नेस असे सांगितले. परंतु आईने पंजाबी ड्रेसच घातला. यामुळे संताप अनावर होऊन या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (२३ फेब्रुवारी) संध्याकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोळा वर्षीय शेरू भोसले असे या मुलाचे नाव आहे. नागठाणे गावात भोसले कुटुंब वास्तव्यास आहे. शेरूच्या आईने घरात पंजाबी ड्रेस परिधान केला होता. मात्र जेव्हा शेरूने आईला पाहिले तेव्हा त्याने आईला तू ड्रेस का घातला, साडी का नेसली नाही, असे विचारले आणि आईला साडी नेसायला सांगितले. परंतु आईने पंजाबी ड्रेसच घातला. यामुळे शेरू रागाच्या भरात घरातून निघून गेला. बराच वेळ शेरू घरी परतला नाही. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता त्याने घराच्या जवळ एका झाडाला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




