अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती आणण्यात आली आहे. मात्र महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे.
सुशांत सिंह प्रकरण हाताळण्यावरुन राज्य सरकारला टीकेला सामोरं जावं लागत आहे त्यातच आता कंगना प्रकरणामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं कळत आहे. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांसोबत काँग्रेस नेतेही नाराज असल्याचं चित्र होतं.
कंगनाच्या कार्यालयावर पालिकेची कारवाई पाहून मनात संशय निर्माण होण्यास संधी- शरद पवार
शरद पवारांनी शिवसेनेने कंगना रणौत प्रकरण हाताळताना लोकांच्या मनात संशय निर्माण होण्यास संधी दिल्याचं म्हटलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनीही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “सत्तेत असताना तुम्ही अशा गोष्टी करु शकत नाही. तुम्ही अत्यंत चुकीचा संदेश पाठवत आहात. कंगना कदाचित भाजपाच्या संपर्कात असेल, भाजपाच्या सांगण्यावरुन ती हे सर्व करत असेल, पण मग तुम्ही त्यांच्या जाळ्यात का अडकत आहात ? मी शांत बसू शकत नाही. हे खूप वाईट दिसतं.”