मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्वाचे मुद्दे :
- मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं.
- उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली.
- सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.
- फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे खासगी सचिव पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर 100 कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं.
- देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल.
- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच्या भेटीनंतर सचिन वाझे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.
- देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा कऱण्यासाठी टार्गेट द्यायचे.
दरम्यान, माजी पोलिस आयुक्तांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर भाजपकडून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी म्हटले आहे कि, “गृहराज्यमंत्री अनिल देशमुख वसुलीचा व्यवसाय करायचे. सचिन वाझे हे त्यांचे रिकव्हरी एजंट होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्वरित हटवावे.”




