राज्यातील रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट केले.
मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. ही गोष्ट त्यांनाही पटल्यामुळे मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया विनासायास पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील.




