जालना : कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी कोल्डचेन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सर्व कामे पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि भारताचे औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहतोय, असे महत्त्वाचे विधान आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
राजेश टोपे यांनी पुढे सांगितले कि, देशातील पाच औषध कंपन्या करोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्याचे काम करत आहेत. यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये उत्पादित झालेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची भारतात साडेबारा हजार लोकांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे तर संपूर्ण जगात साधारण पस्तीस हजार लोकांवर या लसीच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. मी स्वतः सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली आहे.
सीरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची पावले टाकायला सुरुवात केली आहेत. कोरोनावरील लसीच्या ईमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्यात यावी म्हणून सीरमने भारताच्या औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. अदर पूनावाला यांनी काल ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. फायझरनेही त्यांची कोरोना प्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी परवानगी मागितली आहे. भारत बायोटेकनेही अशा परवानगीसाठी अर्ज केला आहे. हे सर्व लक्षात घेता राजेश टोपे यांचे विधान महत्त्वाचे असून राज्यात लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे.